वणी टाईम्स न्युज : गेल्या दीड महिन्यांपासून सुरु असलेली लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया अखेर संपुष्टात आली. लोकसभेचे सातव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान शनिवारी पार पडले. हे मतदान संपत असताना सर्वांना महाराष्ट्रातील 48 जागांवर कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. त्यातच पूर्व विदर्भात प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. चंद्रपूरचे पुढील खासदार कोण ? हे मंगळवार 4 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.
विविध वृत वाहिन्यांच्या एक्झीट पोलमध्ये महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आघाडीवर असून 2014 आणि 2019 प्रमाणेच काँग्रेस गड अभेद्य ठेवणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर भाजपचे सुधीर मुनगंटीवर पिछाडीवर असल्याचा अंदाज काही एक्झीट पोलनुसार सांगण्यात आले आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यापासून प्रतिभा धानोरकर आणि भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगताना दिसत होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातून काँग्रेस पक्षाचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या अकस्मात मृत्यूनंतर त्यांची पत्नी व आमदार प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. कुणबी समाज बाहुल्य मतदार संघ व सहानुभूतीच्या लाटेवर प्रतिभा धानोरकर हमखास निवडून येण्याचा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे.
तर दुसरीकडे अबकी बार चारसौ पारचा नारा देणाऱ्या भाजपला या मतदारसंघातून विजय संपादन करणे फार महत्वपूर्ण ठरणार असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या महाराष्ट्रातील प्रचाराचे रणशिंग देखील चंद्रपूरातून फुंकले होते. मात्र, असे असले तरी काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर हे सद्य स्थितीत भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर भारी पडताना दिसत आहे. मात्र 4 जूनला अंतिम निकाल नेमका काय लागेल या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.