वणी टाईम्स न्युज: वणी शहरातील पद्मावती नगरी येथील लक्ष्मी नारायण अपार्टमेंटमधील एका फ्लॅटवर छापा टाकत वणी पोलिसांनी मोठ्या ऑनलाईन वरली मटका जुगार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी जुगार खेळत असलेल्या तेलंगणा राज्यातील 4 आरोपींसह फ्लॅट मालकावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 4, 5 नुसार गुन्हा दाखल करत 1 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. 23 जुलै रोजी रात्री 8 वाजता वणी पोलीस स्टेशनचे पोउपनि धीरज गुल्हाने हे नाईट ड्युटीवर असताना, पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर यांना विश्वसनीय गोपनीय माहिती मिळाली की, पद्मावती नगरी वणी येथे लक्ष्मी नारायण अपार्टमेंटमध्ये काही इसम मोबाईल व लॅपटॉपच्या साहाय्याने “ऑनलाईन वरली मटका” नावाने जुगार खेळत आहेत. सदर माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांचे आदेशानुसार पोउपनि अंकुश वडतकर व इतर कर्मचाऱ्यांसह पथक तयार करून फ्लॅटवर छापा टाकण्यात आला.
छाप्यावेळी चार जण मोबाईल, लॅपटॉप व टॅबलेटच्या साहाय्याने जुगाराच्या आकड्यांची नोंद करताना रंगेहाथ आढळून आले. गोपीनाथ सोमय्याजुलु बंडी (60 वर्ष), रा. वारंगल, हैद्राबाद, तेलंगणा, राजेंद्र यादगीरी येलगंटी (52 वर्ष), रा. पेगडामपल्ली, वारंगल, तेलंगणा, फरदिन अतिक अहेमद (24 वर्ष, रा. सबा कॉलनी, वणी, स्वामी कोमराया बोक्का (36 वर्ष), रा. मंचेरियल, व मनीष सुरावार रा. वणी तेलंगणा राज्य असे गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी आरोपीकडून 4 मोबाईल फोन, 2 टॅब, 1 लॅपटॉप, कॅल्क्युलेटर व रोख 9 हजार 200 रुपये असे एकूण 1 लाख 54 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या तपासानुसार आरोपींनी WhatsApp चॅटद्वारे “Milan nt close, 229, 25,779 असे वरली मटक्याचे आकडे व ऑनलाईन व्यवहाराचे स्क्रीनशॉट शेअर केल्याचे स्पष्ट झाले. हे सर्व व्यवहार ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून पार पडत होते.
सदरची संपूर्ण कारवाई उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांचे मार्गदर्शनात पोउपनि धीरज गुल्हाने, अंकुश वडतकर, पोकॉ मिथून राऊत, नंदकुमार पुप्पलवार व गजानन कुळमेथे यांनी पार पाडली. पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून साक्षी अॅपमध्ये नोंद करण्यात आली. पुढील तपास वणी पोलीस करत आहे.
🏠 फ्लॅट मालक बाबत शहानिशा न करता नाव टाकले..!
पद्मावती नगरी येथे लक्ष्मीनारायण अपार्टमेंटमध्ये ज्या फ्लॅटमध्ये हा जुगार चालू होता, त्या फ्लॅटच्या मालक म्हणून पोलिसांनी एफआयआर मध्ये मनीष सुरावार यांचे नाव नमूद केले आहे. तसेच सहआरोपी म्हणून त्यांचावर गुन्हाही दाखल केले आहे. मात्र ज्या फ्लॅटमध्ये जुगार पकडला तो माझ्या मालकीचा नसल्याचा खुलासा मनिष सुरावार यांनी केला आहे. पोलिसांनी शहानिशा न करता चुकीच्या पद्धतीने त्यांचा नाव नमूद केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.











