वणी टाईम्स न्युज | कत्तलीसाठी गोवंश जनावरांना वाहनात निर्दयतेने कोंबून तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथ नेत असताना पाटण पोलिसांनी 3 जनावरांची सुटका केली. गोपनीय माहितीवरून बुधवार 6 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता झरीजामनी तालुक्यातील मारोतीपोड फाटाजवळ ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी जनावर वाहतूक करणारा टाटा मॅक्स (MH29 -J 0478) वाहन (किंमत अंदाजे ₹ 5 लाख) व 3 गोवंश जनावर (किंमत 55 हजार) असे 5 लाख 55 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
कारवाई दरम्यान वाहन चालक मोसीन कयुम शेख (28), रा. माथार्जुन यास पोलिसांनी ताब्यात घेतले. तर वाहनात बसलेला दुसरा आरोपी बादल लालचा तुमराम (23), रा. माथार्जुन हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. आरोपींनी प्राण्यांना अत्यंत अमानुष वागणूक दिल्याप्रकरणी त्यांच्यावर प्राण्यांच्या क्रूरतेस प्रतिबंधक कायदा 1960 चे कलम 11 (1)(c), (d), (g), (h) तसेच महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम 1976 चे कलम 5A, 5B, 9 यांअंतर्गत आणि पोलीस कायदा कलम 151 नुसार पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्नील ठाकरे यांनी आपल्या स्टाफसह केली. सदर प्रकरणातून बेकायदेशीर जनावरांची वाहतूक व कत्लीसाठी नेण्याचे प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आले असून, यामागील साखळी उध्वस्त करण्यासाठी पोलीस प्रशासन सजग राहण्याची गरज आहे.










