वणी टाईम्स न्यूज | तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या पथकाने शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायर येथील एक बोगस दवाखाना उघडकीस आणत बनावट डॉक्टरवर कारवाई केली. आरोग्य विभागाने बोगस डॉक्टर अरविंद गणपतराव राऊत (60), रा. वणी याच्यावर महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायी अधिनियम 1961 अंतर्गत पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समीर गोविंदराव थेरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र कायरचे डॉ. संदीप येडमे यांच्याकडून माहिती मिळाली की, कायर ग्राम पंचायतजवळ अरविंद राऊत यांचा बोगस खाजगी दवाखाना सुरू आहे. सदर माहितीची खातरजमा करण्यासाठी आरोग्य विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि इतर अधिकाऱ्यांसह संयुक्तपणे कारवाई करण्यात आली.
सदर पथकाने सकाळी 11.30 वाजता कायर येथे धाड टाकली असता, दवाखान्यात अरविंद राऊत प्रत्यक्ष उपचार करताना आढळून आला. तेथे उपस्थित एका महिला रुग्णाने सांगितले की, ती अनेक वर्षांपासून त्यांच्याकडून उपचार घेत आहे. राऊत हे इंजेक्शन देणे, औषध लिहून देणे यासारखी वैद्यकीय कामे करत होते. दवाखान्यातून स्टेथेस्कोप, बीपी ऑपरेटर्स, सिरींज, विविध औषधे आणि वैद्यकीय कागदपत्रे जप्त करण्यात आली. पंचनाम्यातील साक्षीदारांच्या उपस्थितीत सदर साहित्य सिलबंद करून जप्त करण्यात आले.
या कारवाईत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समीर थेरे, गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप येडमे, विस्तार अधिकारी बंडू जाधव, प्रभारी विस्तार अधिकारी गजानन चेलपेलवार, आरोग्य सेवक मारोती ताजणे, ग्रामसेवक जे. डी. मेश्राम, पंच साक्षीदार चेतन उलमाले व नंदकिशोर आंबोरे हे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
सदर बोगस डॉक्टर अरविंद गणपतराव राऊत (60), रा. वणी याच्यावर शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 चे कलम 33 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.
📞 तुमच्याजवळ अशी माहिती असल्यास आम्हाला जरूर कळवा.










