वणी टाईम्स न्युज : शहरातील सराफा व्यापाऱ्याच्या घरी 30 नोव्हेंबर रोजी पहाटे झालेल्या दरोड्या प्रकरणाचा थरार उलगडत स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी मोठे यश मिळवले आहे. पथकाने एका महिलेसह 3 आरोपींना अटक करून एकूण ₹13,22,835/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरोड्याचा घटनेत सहभागी उर्वरित 4 आरोपींचा शोध सुरू आहे.
घटनाक्रम :
दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी मध्यरात्री सुमारास साधारण 2 वाजता संत गाडगे बाबा चौक, वणी येथील सराफा व्यापारी संजय निळकंठ कोंडावार (वय 74) यांच्या घरात 5 ते 6 अज्ञात आरोपी घुसले. सुरक्षा रक्षकासह कोंडावार यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करण्यात आली आणि सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मिळून ₹12,85,000/- किमतीचा माल दरोडेखोरांनी लुटला. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन वणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक तपासातून गुन्ह्याचा उलगडा :
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाची जबाबदारी सोपवली. तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि बातमीदारांच्या मदतीने संशयितांची छाननी सुरू होती. याचदरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे सागर बजरंग धोंगडे (34), रा. गोधणी कोठा मुलकी, यवतमाळ यास दाते कॉलेज चौक, उमरसरा रोड येथून ताब्यात घेण्यात आले. कौशल्यपूर्ण चौकशीत त्याने वैशाली संजय वाघमारे (45), रा. न्यु नरसाळा, नागपूर हिच्या मदतीने एकूण सहा साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली.
मुद्देमाल जप्त :
पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम : ₹65,835/-, सोन्याचे दागिने : ₹ 11,87,000/- तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, दोन मोबाईल हँडसेट असे एकूण ₹13,22,835/- चा मुद्देमाल हस्तगत केले. यानंतर पोलीस पथकांनी आरोपी वैशाली वाघमारे, रा. न्यू नरसाळा नागपूर तसेच ऋतिक लीलाधर गेडाम रा. विठ्ठलवाडी, यवतमाळ यास अटक केली असून उर्वरित चार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना आहेत.
यशस्वी पथक :
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश चवरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पथकामध्ये सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि धनराज हाके, अंमलदार सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, सलमान शेख, नरेश राऊत, सतीश फुके, दिगांबर पिलावन (स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ) तसेच पो.स्टे. वणी येथील पोउपनि धिरज गुल्हाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.










