वणी टाईम्स न्युज: महाराष्ट्र शासनाने तंबाखू, सुगंधित सुपारी व गुटख्याच्या उत्पादन, साठवणूक व विक्रीवर पूर्णतः बंदी घातली असतानाही यवतमाळ जिल्ह्यातील वणी उपविभागात ही बंदी केवळ कागदोपत्रीच उरल्याचे भयावह चित्र दिसून येत आहे. किराणा दुकाने व पान टपऱ्यांवर खुलेआम गुटखा व तंबाखूयुक्त खर्रा विक्री होत असून, चंद्रपूर जिल्ह्यातील काही तस्कर पोलिस व अन्न-औषध प्रशासनाच्या संगनमताने दररोज लाखो रुपयांचा प्रतिबंधित माल शहरात पुरवठा करीत असल्याचे गंभीर आरोप होत आहेत.
चिंतेची बाब म्हणजे, नकली दारूप्रमाणेच गुटखा माफियांनी विविध कंपनीच्या नावाने ३०० व १२० बनावटी तंबाखू तसेच गुटख्याची विक्री सुरू केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी सरळ खेळ सुरू असतानाही संबंधित प्रशासन मूक-बधिर असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
८ डिसेंबर २०२५ रोजी पंचशील नगर येथे पकडण्यात आलेल्या तंबाखू व गुटख्याच्या प्रकरणाला पोलिसांनी थंड बस्त्यात टाकल्याची चर्चा आहे. तर रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी गोकुळनगर भागात मजा तंबाखूचे रिकामे डबे विकत घेऊन जात असताना एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आर्टिगा कार पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली. या प्रकरणातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पान टपरी चालकांकडून वापरलेले डबे ५० रुपये प्रति डबा दराने खरेदी करून त्यात नकली तंबाखू भरून पुन्हा विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. मात्र 3 दिवसांनंतरही सदर प्रकरणी कोणतीही चौकशी किंवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही.
दरम्यान, गुटखा तस्करीमध्ये कोरपना येथील मकसूद हा मोठा सूत्रधार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र त्याचे राजकीय लागेबांधे असल्याने त्याच्यावर कारवाई होत नसल्याचे आरोप नागरिक करत आहेत. महिन्याकाठी लाखो रुपयांचा हप्ता देऊन संपूर्ण वणी उपविभागात अवैध गुटखा-तंबाखू व्यवसाय सुरू असल्याची खमंग चर्चा शहरात रंगली आहे.
या गंभीर प्रकरणात पोलिस व अन्न-औषध प्रशासनाने तत्काळ कठोर कारवाई करावी, तस्करीचे संपूर्ण जाळे उघड करावे व दोषींवर कठोर शिक्षा करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे. अन्यथा शासनाच्या बंदी आदेशांची थट्टा करत सुरू असलेला हा अवैध धंदा नागरिकांच्या आरोग्यावर घाला घालत राहील, असा संताप व्यक्त केला जात आहे.










