वणी टाईम्स न्यूज : बकऱ्या शेतात गेल्याच्या कारणावरून एका दलित व्यक्तीस जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना 15 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजताच्या मारेगाव तालुक्यातील खडकी घडली. या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारेगाव पोलीस ठाण्यात अशोक रामचंद्र ढवस (55), रा. खडकी, ता. मारेगाव विरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यासह भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गंभीर स्वरूपाचे कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी अशोक बबन सातपुते रा. नरसाळा हा मागील तीन महिन्यांपासून खडकी येथील विनोद भिमाजी कोयचाडे या शेतकऱ्याच्या बकऱ्या चारण्याचा काम करतो. दिनांक 15 जुलै रोजी बकऱ्या चारून गावात परत गावात आला. सायंकाळी 6.30 वाजता दरम्यान पान टपरीवर बसून असताना आरोपी अशोक रामचंद्र ढवस तिथं आला व फिर्यादीला अडवून त्याच्या बकऱ्यांमुळे शेतातील पिकांचे नुकसान होत असल्याचा आरोप करत, त्यास लाथाबुक्यांनी मारहाण केली.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने त्यास सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करत तुझ्या बकऱ्या माझ्या शेतात आल्यास तुला मारून टाकीन, अशी धमकी दिली. या मारहाणीत फिर्यादीच्या छातीवर व कमरेवर गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी त्यास वणी येथील डॉ. कवाडे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तपासणीत त्याच्या छातीच्या दोन हाडांना (पिसुटी) फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 अंतर्गत कलम 3(2)(va), 3(1)(s), 3(1)(r) तसेच भारतीय न्याय संहिता 2023 नुसार कलम 351(3), 352, 117(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात मारेगाव पोलीस करीत आहेत.
✍️ वणी टाईम्स न्यूज
(अधिकृत बातम्यासाठी संपर्कात रहा)










