वणी टाईम्स न्युज : लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने अत्याचार करणाऱ्या आरोपी युवकास तक्रार दाखल होऊनही 7 दिवस उलटूनसुद्धा अटक करण्यात न आल्यामुळे संतप्त नागरिकांनी आज सोमवार 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता वणी पोलीस ठाण्यावर धडक दिली. या वेळी पीडित तरुणीचे नातेवाईक तसेच कॉलनीतील 100 ते 150 स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी पोलीस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत आरोपीला त्वरित अटक करण्याची जोरदार मागणी केली.
संबंधित प्रकरणात पीडित तरुणीने 29 जुलै 2025 रोजी वणी पोलीस ठाण्यात ठोस पुराव्यासह तक्रार दाखल केली होती. मात्र, सात दिवसांनंतरही मेघदूत कॉलनी येथील आरोपी मोहम्मद हकीमोद्दीन पठाण (32) हा मोकाट असल्याने पीडितेला न्याय मिळण्याच्या आशा धूसर झाल्या होत्या. यामुळे पीडितेचे कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी एकत्र येत थेट पोलीस ठाण्यात धडक दिली.
यावेळी ठाणेदार गोपाल उंबरकर यवतमाळ येथे असल्याने जमाव ठाण्यासमोर एक तास ठिय्या देऊन बसला होता. वातावरणात तणाव निर्माण होण्याची शक्यता असतानाच ठाणेदार उंबरकर घटनास्थळी पोहचले. त्यानंतर नागरिक प्रतिनिधींसोबत केबिनमध्ये चर्चा झाली. नागरिकांचा ठाम आग्रह होता की, गुन्हेगारी स्वरूपाचा गंभीर प्रकार घडूनही पोलीस अटकेत विलंब का करत आहेत? संबंधित आरोपीवर तत्काळ कारवाई करण्यात यावी आणि पीडितेला न्याय मिळवून द्यावा.
पोलीस सूत्रांकडून समजले की, तपास अंतिम टप्प्यात असून लवकरच कठोर कारवाई करण्यात येईल. मात्र, नागरिकांनी यावेळी पोलिसांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवला. या प्रकरणामुळे वणी शहरात संतापाची लाट पसरली असून महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.










