वणी टाईम्स न्युज : भगवान शिवाच्या दर्शनासाठी आणि श्रावण मासातील पवित्र पर्वानिमित्त उद्या, 6 ऑगस्ट रोजी वणी येथून शिरपूर महादेव गडापर्यंत भव्य पायदळ कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कावड यात्रा बुधवारी सकाळी 9 वाजता जैताई माता देवस्थान, वणी येथून प्रस्थान करणार असून, शहरात तसेच परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

या पवित्र यात्रेच्या मार्गात शिवभक्तांसाठी विविध ठिकाणी अल्पोहार व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय, एमआयडीसी चौक येथून वाहनांची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग व लांबचा प्रवास करणाऱ्या भक्तांना मदत होईल. यात्रेसोबत एक रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक सतत कार्यरत राहणार असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ वैद्यकीय मदत पुरवली जाईल.
या यात्रेमुळे वणी परिसरात धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून, शहरातून व परिसरातील गावांमधून हजारो शिवभक्त या यात्रेत सहभागी होण्यास सज्ज झाले आहेत. कावड यात्रा समितीतर्फे कावड निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार असून, जास्तीत जास्त भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कावड यात्रेचे आयोजन सुस्थितीत पार पाडण्यासाठी स्थानिक स्वयंसेवक, धार्मिक मंडळे आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. शिवभक्तांनी या भक्तिपूर्ण यात्रेत सहभागी होऊन श्रावण मासातील पुण्य कमवावे, असे आवाहन कावड यात्रा समितीतर्फे करण्यात आले आहे.










