जितेंद्र कोठारी, वणी |

झरीजामणी तालुक्यातील पैनगंगा नदीच्या हिरापूर मांगली रेती घाटावर अवैध रेती उत्खनन प्रकरणी हिरापूर रेतीघाट संचालकांसह 6 जणांवर मुकुटबन पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महसूल मंडळ अधिकारी सुभाष खैरे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली.
उल्लेखनीय आहे की, पैनगंगा नदीपात्रातील मौजा हिरापूर येथील रेतीघाटावर बुधवारी मध्यरात्री धाड टाकत महसूल व पोलिस पथकाने अवैध रेती उत्खननाचा मोठा प्रकार उघडकीस आणला. या कारवाईत पोकलेन, जेसीबी, दोन ट्रक, डिझेल बॅरल व रेती असा मिळून सुमारे १ कोटी ८ लाख २४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
उप विभागीय पोलिस अधिकारी पांढरकवडा रॉबिन बंसल यांचे नेतृत्वात एलसीबी पथकाने रात्री 1 वाजता दरम्यान हिरापूर मांगली रेती घाटावर छापा मारला होता. त्यावेळी पैनगंगा नदीपात्रात पोकलेन मशीन व जेसीबीच्या सहाय्याने ट्रक क्रमांक MH-29-BE-8558 मध्ये रेती भरली जात असल्याचे दिसून आले. रेती भरलेल्या ट्रकमधून पाणी टपकत असल्याने नुकतेच उत्खनन केल्याचे स्पष्ट झाले.
ऑपरेशन ‘मिडनाईट’ : हिरापूर रेती घाटावर पोलिसांची धाड – पोकलेन, जेसीबी व 2 ट्रक जप्त
पोलिसांना पाहताच वाहनांवरील चालक अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला मात्र ते हाती लागले नाहीत. तहसीलदारांच्या उपस्थितीत पंचनाम्याची कार्यवाही करत पोलिसांनी पोकलेन मशीन (५० लाख) जेसीबी क्रमांक MH-29-BV-4615 (३० लाख) ट्रक क्रमांक MH-29-BE-8558 (१५ लाख ) ट्रक क्रमांक MH-29-BE-4140 (१३ लाख) डिझेल १४० लिटर असे एकूण 1 कोटी 8 लाख 24 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणात रेती घाटाचे प्रोप्रायटर सैय्यद मन्सूर सैय्यद दाऊद व देखरेख करणारे सैय्यद कादर सैय्यद दाऊद (दोघेही रा. यवतमाळ) तसेच संबंधित वाहन मालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ मधील कलम ४८(७) व ४८(८) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिरापूर रेतीघाटावर मध्यरात्री झालेल्या या कारवाईमुळे अवैध रेती उत्खननाच्या रॅकेटवर मोठा आघात बसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.










