वणी टाईम्स न्युज: शिरपूर पोलीस ठाणे हद्दीत बेलोरा येथे आढळलेल्या वृद्ध इसमाच्या मृतदेह प्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. मृतकाच्या मुलाने 4 महिन्यापूर्वी शेजाऱ्याची बायको पळवून नेली होती. त्या सुडातून भद्रावती येथील आरोपी यांनी मुलाच्या वडिलांचे चिखलगाव (वणी) येथून अपहरण करून खून केल्याची तक्रार शिरपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी सोमठाणा (भद्रावती) येथील निलेश दिलीप ढोले याच्यावर अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचाही तपास सुरू आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रिया विनोद तिरणकर (27) रा. बोरगाव, ता. वणी, ह.मु. झरी, ता. झरी, जि. यवतमाळ हिने शिरपूर पोलीस स्टेशनला दिलेल्या जबानीत सांगितले की, तिचे भाऊ नितेश कुडमेथे यांनी चार महिन्यांपूर्वी आरोपी निलेश ढोले याची पत्नीला पळवून नेले होते. या घटनेचा राग मनात धरून निलेश ढोले हा कुडमेथे कुटुंबाला सतत जिवे मारण्याच्या धमक्या देत होता. त्यामुळे फिर्यादीचे वडील विनायक कुडमेथे व आई माया कुडमेथे हे भितीमुळे भद्रावती सोडून चिखलगाव येथे त्यांची बहिण सुधा टेकाम यांच्या घरी राहायला आले होते.
दिनांक 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता विनायक कुडमेथे व त्यांचा नातू (10) किराणा सामान घेण्यासाठी वणीला गेले होते. सुमारे 5 वाजता नातू हा रडत एकटाच घरी आला. त्याने आई प्रिया तिरणकरला सांगितले की, “गंधारे किराणा दुकानासमोर एक पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी आली आणि त्यातून उतरलेला निलेश ढोले व त्याचा साथीदार यांनी आजोबांना शिवीगाळ करत मारहाण केली व जबरदस्तीने गाडीत बसवून घेऊन गेले.”
घाबरलेल्या प्रिया तिरणकर यांनी नातेवाईकांना माहिती दिली व सर्वांनी वणी परिसरात शोध घेतला. मात्र विनायक कुडमेथे मिळून आले नाहीत. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता विनायक यांचे मोठे बंधू नारायण कुडमेथे यांनी फोनद्वारे कळवले की, “विनायक कुडमेथे हे बेलोरा फाटा येथे जखमी व बेशुद्ध अवस्थेत पडले आहेत.” पोलीसांनी घटनास्थळावर जाऊन तपास केला असता ते मृत अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी वणी पोलिसांनी निलेश दिलीप ढोले (वय अंदाजे 40), रा. सोमठाणा, भद्रावती, जि. चंद्रपूर व त्याच्या सोबत असलेल्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेतील (BNS) कलम 3(5), 140(1), 103(1) अन्वये गुन्हा दाखल केला. प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून शिरपूर पोलिसांचे पथक आरोपींच्या मागावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.










