वणी टाईम्स न्युज: शहरातील प्रगती नगर भागात एका वकीलाच्या घरातून रात्रीच्या सुमारास चार्जिंगवर लावलेला मोबाईल चोरट्याने लंपास केला. वकिलांनी चोरट्याचा पाठलागही केला, मात्र अंधाराचा फायदा घेऊन चोरटा पळून जाण्यास यशस्वी झाला. या संदर्भात पेशाने वकील असलेले मुकुंद मधुकर एकरे (54) यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
त्यांनी दिलेल्या जबानी तक्रारीनुसार, 1 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 12.30 ते 12.45 च्या सुमारास त्यांच्या घरात चोरीची ही घटना घडली. एकरे यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने दरवाजे उघडे ठेवलेले होते. दरम्यान, झोपेत असताना त्यांनी आपला लावा कंपनीचा जुना वापरता मोबाईल (किंमत सुमारे ₹6000) चार्जिंगसाठी अलमारीवर ठेवला होता. झोपेतून जागे झाल्यानंतर त्यांनी अंदाजे 20-25 वयोगटातील व फिकट निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाचा बरमूडा घातलेला अनोळखी तरुणाला घरातून मोबाईल घेऊन पळताना पाहिले.
एकरे यांनी त्याचा पाठलाग केला, मात्र तो पसार होण्यात यशस्वी झाला. परिसरात शोध घेतला असता देखील तो मिळून आला नाही. याबाबत फिर्यादी मुकुंद एकरे यांनी पोलीस ठाण्यात जबानी रिपोर्ट सादर केला आहे. पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. घरफोड्या व मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
📰 अधिक अपडेटसाठी भेट द्या : www.wanitimes.com










