📰 वणी टाईम्स न्युज : नगर परिषद वणीच्या आगामी निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले असून, यावेळी शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी अध्यक्षपद राखीव ठेवण्यात आले आहे. मुंबई येथे सोमवार दि. 6 ऑक्टोबर रोजी राज्य निवडणूक आयोगातर्फे लॉटरी प्रणालीद्वारे नगर परिषद अध्यक्षपद आरक्षणाचा निर्णय जाहीर करण्यात आला.
आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न बाळगून असलेले अनेक दिग्गज व संभाव्य उमेदवारांच्या राजकीय आकांक्षांवर अक्षरशः पाणी फिरले आहे. आतापर्यंत वणी नगर परिषदेच्या राजकारणात विविध पक्ष व गटांचे वर्चस्व राहिले असले, तरी या नव्या आरक्षणामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडणार आहे. इतिहासात प्रथमच वणी शहराची धुरा अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला चालवणार असल्याने शहराच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे.
पार्श्वभूमी:
सन 2016 च्या नगर परिषद निवडणुकीत अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले होते. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तारेंद्र गंगाधरराव बोर्डे हे मताधिक्याने निवडून आले होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत अनुसूचित जमाती (महिला) आरक्षण लागल्यामुळे सर्वच पक्षांना नवीन रणनीती आखावी लागणार आहे. स्थानिक पातळीवर आता अनुसूचित जमातीतील महिला नेतृत्वाच्या शोधाला सुरुवात झाली आहे. विविध पक्षांकडून संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू असून, राजकीय रंगमंचावर नवी चेहरे पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.










