मुकुटबन प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारे फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी (HSC) परीक्षेचा निकाल 2 मे रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. या निकालात झरीजामणी तालुक्यातील मांगली (हि) या छोट्याशा गावातील कु. रिया संजय लेडांगे हिने 79.50 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
रिया ही आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा येथे विज्ञान शाखेची विद्यार्थिनी असून तिने महाविद्यालयातून मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, रियाने दहावीच्या परीक्षेतही गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल, मुकुटबन येथे 90 टक्के गुण मिळवत तालुक्यात आपले नाव उज्ज्वल केले होते. सातत्यपूर्ण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
रिया आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षकवृंद आणि मार्गदर्शकांना देत असून, तालुक्यातून मिळालेल्या शुभेच्छांबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. तिच्या या यशाबद्दल झरीजामणी तालुक्यात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.










