जितेंद्र कोठारी, वणी : अस्सल सोन्याची 3 किलो वजनाची मूर्ती देण्याचे आमिष दाखवून वणीतील एका भंगार व्यवसायिकाकडून तब्बल 20 लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर प्रकरणी पीडित भंगार व्यावसायिकांनी यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अब्दुल सत्तार अब्दुल गफुर (61) रा. नवीन लालगुडा, वणी हे भंगार व्यवसाय करतात. त्यांच्या ओळखीचे बाभुळगाव तालुक्यातील लाईक अनवाज शेख कलीम यांनी त्यांना 3 किलो सोन्याची मूर्ती फक्त 20 लाख रुपयांत देण्याचे आमिष दाखवले. आमिषाला बळी पडून फिर्यादी दि. 29 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास यवतमाळ बाभुळगाव मार्गावर कापरा ते लखमापूर फाटा येथे 20 लाख रुपये घेऊन पोहचले.
त्याठिकाणी आरोपी लाईक अनवाज शेख कलीम (25), रा. सावर, ता. बाभुळगाव, जि. यवतमाळ आणि आकाश कुमार (पूर्ण नाव अज्ञात) ह्या दोघांनी फिर्यादीकडून 20 लाख रुपये घेऊन त्यांना मूर्ती दिली. मात्र आरोपींनी दिलेली मूर्ती नंतर तपासून पाहिली असता ती खोटी असल्याचे उघड झाले. मूर्ती घासल्यावर तिचा रंग निघून ती काळवंडल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी 30 एप्रिल रोजी यवतमाळ (ग्रामीण) पोलिस ठाण्यात आरोपी लाईक अनवाज शेख कलीम (25), रा. सावर, ता. बाभुळगाव, जि. यवतमाळ आणि आकाश कुमार (पूर्ण नाव अज्ञात) विरुद्ध 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. तक्रारींवर आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 318(4) व 3(5) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या व्यवहारांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.










