वणी टाईम्स न्युज:
जिल्ह्यातील अंमली पदार्थ तस्करीवर लगाम घालण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत शिरपूर पोलिसांनी मोठी यशस्वी कारवाई करत अंतरजिल्हा ड्रग्स तस्कराला अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ९ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलीस स्टेशन स्तरावरील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार ड्रग्स विक्री व सेवनाविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असताना शिरपूर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, पुनवट (ता. वणी) येथील व सध्या नागपूर येथे वास्तव्यास असलेला श्रेयश उर्फ गुड्डु शंशीकांत पाटील (वय २४) हा वणी-शिरपूर परिसरात अंमली पदार्थांची विक्री करीत असून तो वणी येथे ड्रग्स पुरवठ्यासाठी येणार आहे.
नाकाबंदी दरम्यान आरोपी जेरबंद
माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पथके तयार करून चारगाव-वणी रोडवर सापळा रचला. सायंकाळी सुमारे ५ वाजता चारगावकडून येणारी DATSUN GO+ (क्र. MH 32 AH 4126) ही सिल्व्हर रंगाची कार थांबवून झडती घेतली असता आरोपीकडून 57.1 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) — अंदाजे किंमत ₹5,60,000, डिजिटल वजन काटे 3, (₹15,000), मोबाईल फोन — ₹70,000, चारचाकी वाहन — ₹4,00,000 असे एकूण ₹9,82,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना जप्त केला.
न्यायालयीन कोठडी व पुढील तपास
आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी (PCR) सुनावली आहे. या कालावधीत ड्रग्स तस्करीच्या जाळ्याचा उगम शोधण्यासाठी सखोल तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले असून, ड्रग्स विक्री किंवा सेवनाबाबत माहिती असल्यास शिरपूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा; माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल.
कारवाईत सहभागी अधिकारी
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूरचे ठाणेदार संतोष मनवर व पीएसआय धीरज गुल्हाणे, सुरज साबळे, इक्बाल शेख, प्रशांत झोड, पंकज कुडमेथे, परमेश्वर दराडे, किरण दासरवार, सुनील दुबे आदींनी यशस्वीरीत्या पार पाडली.










