वणी टाईम्स न्यूज | वणी येथून प्रवासी घेऊन नांदेपेराकडे निघालेल्या तीनचाकी प्रवासी ऑटोला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात ऑटोचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून त्यातील सात प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. ही दुर्घटना मंगळवारी सायंकाळी सुमारे 6.15 वाजताच्या सुमारास वणी–नांदेपेरा मार्गावरील वांजरी गावाजवळ घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मजरा गावातील काही महिला तसेच शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी ऑटोने वणी येथून आपल्या गावाकडे जात होते. दरम्यान, वांजरी गावाजवळ समोरून येणाऱ्या MH-34 CQ-0956 क्रमांकाच्या ट्रकने भरधाव वेगात ऑटोला धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की ऑटो पूर्णतः मोडून पडला आणि त्यातील सर्व प्रवासी जखमी झाले.
अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून गावकऱ्यांनी तत्काळ मदतीचा हात पुढे करत जखमींना दुसऱ्या ऑटो व खासगी वाहनांच्या सहाय्याने वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले, तर उर्वरित जखमींवर शहरातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. जखमी प्रवाशांची सविस्तर माहिती उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही.
दरम्यान, या अपघातामुळे काही काळ वणी–नांदेपेरा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वेगमर्यादा व वाहतूक नियंत्रणाबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.










