वणी टाईम्स न्युज : वणी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व 14 प्रभागातील 29 उमेदवारांच्या निवडणुकात निवडणूक आयोगाने बदल केले आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 14 (क) ची निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्या आहेत. उर्वरित प्रभागासाठी निवडणूक पूर्व नियोजित कार्यक्रमाप्रमाणे 2 डिसेंबर रोजी होणार आहे. तर प्रभाग क्रमांक 14 (क) ची निवडणूक 20 डिसेंबर रोजी व निवडणूक निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात प्रभाग क्रमांक 14(क) साठी ज्या उमेदवाराने नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहे. त्यांना 11 डिसेंबर पर्यंत नामांकन अर्ज परत घेता येणार आहे. या दरम्यान नवीन अर्ज दाखल करता येणार नाही. तसेच 11 डिसेंबर रोजी अंतिम उमेदवारी यादी व निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येईल. 20 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान व 21 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजतापासून मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येईल.

नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 1 ते 13 तसेच प्रभाग 14 (अ) व 14(ब) मध्ये दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदान होऊन दुसऱ्या दिवशी 3 डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने निवडणूक लढत असलेल्या इतर उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.










