वणी टाईम्स न्युज : मकरसंक्रांती निमित्त पतंग उडविताना आता खबरदारी घेण्याची गरज आहे. नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविणे हे कायद्याने पूर्णतः प्रतिबंधित असून, त्यातून मानवी जीवितासह पक्ष्यांच्या जीवनाला गंभीर धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नायलॉन मांजाचा वापर, विक्री व साठ्यावर कडक बंदी घातली आहे. या न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वणीचे ठाणेदार पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी दिला आहे.

वापरकर्त्यांवर थेट दंडात्मक कारवाई
नायलॉन मांजा वापरताना कोणी आढळल्यास थेट दंड आकारण्यात येणार आहे. अल्पवयीन मुले नायलॉन मांजा वापरत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या पालकांवर २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. तसेच प्रौढ व्यक्ती नायलॉन मांजा वापरताना आढळल्यास संबंधितांवरही २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार असून, ही रक्कम थेट दोषींकडून वसूल केली जाईल.
विक्रेत्यांवर अडीच लाखांचा दंड
नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरुद्ध अधिक कठोर भूमिका घेतली जाणार आहे. अशा विक्रेत्यांवर तब्बल २ लाख ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. सदर दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्वतंत्र ‘लोककल्याण खाते’ उघडण्यात येणार असून, क्यूआर कोडच्या माध्यमातून थेट दंड भरण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
नायलॉन मांजामुळे वाढतो जीवघेणा धोका
नायलॉन मांजा अत्यंत धारदार व मजबूत असल्याने दुचाकीस्वार, पादचारी, लहान मुले तसेच पक्ष्यांच्या गळ्याला व शरीराला गंभीर दुखापती होण्याचे प्रकार घडतात. अनेक वेळा यामुळे अपंगत्व किंवा मृत्यूदेखील ओढवतो. या गंभीर धोक्यांची दखल घेतच उच्च न्यायालयाने नायलॉन मांजावर बंदी घातली आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
वणी पोलीस प्रशासनामार्फत सर्व नागरिकांना पतंग उडविताना नायलॉन मांजाचा वापर पूर्णतः टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने केवळ सूती किंवा कागदी मांजाच वापरावा, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही तडजोड न करता कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून स्वतःसह इतरांच्या जीविताची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असे आवाहन वणी पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.










