वणी टाईम्स न्युज: वणी शहरात दिवसाढवळ्या चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे सायडिंग वणी येथे कार्यरत असलेले WCL कर्मचारी राजेश नानाजी चौधरी (59), रा. भोंगळे लेआउट, वणी यांची 70 हजार रुपयांची रोकड अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना मंगळवार, दि. 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश चौधरी यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, मेन शाखा वणी येथून सायंकाळी सुमारे 4 वाजता 70 हजार रुपये रोख काढले होते. या रकमेत 500 रुपयांच्या 80 नोटा व 200 रुपयांच्या 150 नोटांचा समावेश होता. ही रोकड ‘अभिनंदन ज्वेलर्स’ नाव असलेल्या हँडबॅगमध्ये ठेवून ते दुचाकी क्रमांक MH-34-AF-3363 ने आवारी लेआउटकडे निघाले.
जटाशंकर चौकाजवळ पांडे मोबाईल शॉपी समोर एका अज्ञात इसमाने त्यांना थांबवून दुचाकीवर घाण लागल्याचे सांगितले. वाहतुकीची वर्दळ असल्याने ते थांबले नाहीत. पुढे भाजीमंडी परिसरात जामनगरी दुकानाजवळ त्यांनी दुचाकी उभी करून साफसफाईसाठी खाली उतरले. यावेळी त्यांनी पैशांची बॅग दुचाकीच्या हँडलला अडकवून जवळच्या किराणा दुकानातून कागद आणण्यासाठी गेले.
किराणा दुकानातून त्वरित परतल्यानंतर दुचाकीवर अडकवलेली बॅग दिसून आली नाही. परिसरात शोध घेऊनही बॅग न सापडल्याने अज्ञात इसमाने ही बॅग चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी राजेश चौधरी यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये जबानी तक्रार दाखल केली असून, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.










