वणी टाईम्स न्युज: येथील प्रेस वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धेचा बाळशास्त्री जांभेकर फिरता करंडक यंदाही स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलने पटकाविला. सलग चौथ्या वर्षी हा मान मिळवून स्वर्णलीला स्कूलने आपल्या सातत्यपूर्ण गुणवत्तेची छाप पाडली आहे.

प्रेस वेल्फेअर असोसिएशन दरवर्षी प्रजासत्ताक दिनी ही स्पर्धा आयोजित करते. यंदा शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या स्पर्धेत २० शाळांच्या चमूंनी उत्स्फूर्त सहभाग घेत बहारदार नृत्यप्रकार सादर केले. स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, ठाणेदार गोपाल उंबरकर, असोसिएशनचे अध्यक्ष अनिल बिलोरीया यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष विद्या सचिन आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन कोषाध्यक्ष तुषार अतकारे व गजानन कासावार यांनी केले.
पूर्व माध्यमिक गटात प्रथम क्रमांक शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय, द्वितीय संताजी इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय जनता विद्यालय, तर प्रोत्साहनपर बक्षीस नगर परिषद शाळा क्रमांक सातने पटकाविले.माध्यमिक गटात प्रथम क्रमांक स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल, द्वितीय विवेकानंद विद्यालय, तृतीय वणी पब्लिक स्कूल, तर प्रोत्साहनपर बक्षीस शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयला देण्यात आले.

दिव्यांग गटात रामदेवबाबा मूकबधिर विद्यालयच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याला उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली. स्पर्धेदरम्यान विजय चोरडिया, संजय खाडे, किरण दिकुंडवार, सहा.पो.नि.विजय महाले, संजय निमकर, निकेत गुप्ता, दीपक मत्ते व डॉ. गणेश लिमजे यांचा प्रेस वेल्फेअरच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल रवि बेलुरकर यांचाही सत्कार करण्यात आला.
बक्षीस वितरण आमदार संजय देरकर व शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव अशोक सोनटक्के यांच्या हस्ते पार पडले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राचार्य हेमंत चौधरी व नृत्यदिग्दर्शिका आस्था दहेकर यांनी काम पाहिले. आभार प्रदर्शन विनोद ताजने यांनी केले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सचिव सागर बोढे, उपाध्यक्ष रमेश तांबे, सहसचिव जितेंद्र डाबरे, किशोर चवने, मंगल तेलंग, सुरज चाटे, बंडू निंदेकर, पुरुषोत्तम नवघरे, लोकेश गुंडलवार, सुनील पाटील, रज्जाक पठाण व महादेव दोडके यांनी परिश्रम घेतले. बाळशास्त्री जांभेकर फिरता करंडक स्व. ऋषी पिदुरकर यांचे स्मृती प्रीत्यर्थ योगेश पिदूरकर यांच्यातर्फे, तर पूर्व माध्यमिक व माध्यमिक गटातील विजेत्या शाळांना देण्यात आलेले चषक स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातर्फे प्रायोजित करण्यात आले होते.










