वणी : मराठा सेवा संघ परिवाराचे वतीने दि 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन वणी शहरात करण्यात आले आहे. देशातच नव्हे तर संपुर्ण जगभरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याचे निमीत्याने नाविन्यपुर्ण कार्यक्रमाची आखणी आणि नियोजन होत आहेत.
याच आनंद उत्सवाचे औचित्याने शिवाजी चौक वणी येथे सायंकाळी 6 वाजता पासुन शिवजयंती उत्सवाचा मुख्य कार्यक्रम सुरु होईल. प्रारंभी शिवतिर्थावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांचे हस्ते माल्यार्पण व अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे सिनेट सदस्य आणि संभाजी ब्रिगेड चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष प्रा.डॉ. दिलीप चौधरी यांचे व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर, उद्घाटक म्हणुन माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर तर स्वागताध्यक्ष पदी म.रा.पणन महासंघाचे संचालक संजय खाडे असतील. या जाहीर सभेला उप विभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, एसडीपीओ गणेश किंद्रे, अजय धोबे, प्रा.बाळकृष्ण राजुरकर, नामदेव जेनेकर, डॉ.शांताराम ठाकरे, संजय निमकर, रमेश येरणे, अनिल हेपट, वंदना आवारी, किरण देरकर, भारती राजपुत, देवराव धांडे, विधीज्ञ विनोद चोपणे, मंगल तेलंग, विजय नगराळे, रवि चांदणे, डॉ.अविनाश खापने हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

शिवजयंती उत्सव हा समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना व समाजबांधवांना एका समान ध्येयाने प्रेरित करून स्वातंत्र्य, समानता व बंधुभाव निर्माण करणारा आहे. त्यामुळे या उत्सवाचे माध्यमातुन लोकांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हावी, असा प्रयत्न असेल. याच जाहीर सभेत शेतमालाला हमीभाव, जातनिहाय जनगणना, सरकारी नोकरभरती तसेच जुनी पेंशन योजना या बाबत ठराव पारीत करण्यात येईल.
सर्व नागरिकांनी सदर जाहीर सभेत सहभागी होऊन शिवजयंती उत्सव सोहळ्याचा आनंद घ्यावा. असे आवाहन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आणि विर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.










