वणी टाईम्स न्युज | राज्यात वाढत असलेल्या तथाकथित लव्ह जिहाद प्रकरणांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात स्वतंत्र व कठोर कायदा तात्काळ लागू करावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीसह विविध महिला संघटनांनी केली आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले.

शुक्रवार, २० फेब्रुवारी रोजी प्रतिनिधीमंडळाने नायब तहसीलदार उल्हास निमेकर यांच्याकडे निवेदन सादर केले. या वेळी शहरातील विविध महिला संघटना, सामाजिक संस्था तसेच धार्मिक व हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलांवरील अत्याचार व फसवणुकीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कठोर कायदा असणे आवश्यक आहे. समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी हा लढा महत्त्वाचा असल्याचे मत सनातन संस्थेच्या कविता आस्वले यांनी व्यक्त केले. तर रणरागिणी शाखेच्या सरिता कोंडावार यांनी राज्यात कायदा तात्काळ लागू करण्याची आग्रही मागणी केली.
यावेळी भाजपचे राजू वाघमारे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अनुराग काठेड, आरती मंडळाचे अर्जुन वैद्य, शंकर झाडे, आर्यन हर्षवाल, भाजपा महिला गटाच्या दिपाली देहारकर, पुष्पा चिडे, लीला इंदोलिया, रजनी राजूरकर, मंदा पारखी, लोभेश्वर टोंगे यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. निवेदनाद्वारे राज्य सरकारने येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विषयावर निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.










