वणी टाईम्स न्युज: तालुक्यातील ढाकोरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे मकर संक्रांतीनिमित्त बालआनंद मेळावा तसेच महिला मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने मोलाचे सहकार्य करणारे ढाकोरी ग्रामपंचायतचे सरपंच अजय कवरासे यांचा शाळेच्या वतीने गौरव व सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रबोधनासाठी सरपंच अजय कवरासे यांनी विधानभवनाची शैक्षणिक सहल आयोजित करून लोकशाही व्यवस्था, शासनाची कार्यपद्धती व प्रशासनाची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत असून नागरिकत्वाची जाणीव अधिक दृढ होते. याशिवाय शाळेच्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांना त्यांनी वेळोवेळी सक्रिय पाठबळ देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन शाळा व्यवस्थापनातर्फे त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाकर दुर्गे उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांमध्ये शाळेचे मुख्याध्यापक देवानंद निकुंबे, वैशाली चतुर, कुणाल पवार, माधुरी कावडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक निकुंबे यांनी करून उपक्रमाच्या उद्देशावर प्रकाश टाकला.
बालआनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी मांडले. या माध्यमातून व्यवहारज्ञान, बचतीचे महत्त्व तसेच प्रामाणिक श्रमातून मिळणाऱ्या कमाईचे मूल्य विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून समजले. महिला मेळाव्यात महिलांनी मनोरंजनात्मक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. हळदी-कुंकू कार्यक्रम, मार्गदर्शन सत्र व सांस्कृतिक सादरीकरणामुळे आनंद, उत्साह आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कुणाल पवार यांनी केले, तर आभारप्रदर्शन वैशाली चतुर यांनी मानले.










