वणी टाईम्स न्युज: बी.सी.सी.आय. तर्फे आयोजित १५ वर्षांखालील महिला एलीट ग्रुप ‘बी’ लीग स्पर्धेसाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या विदर्भ महिला क्रिकेट संघात लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल, वणी येथील विद्यार्थिनी स्वरा मंगेश करंडे हिची सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा दिनांक २ ते १० जानेवारी दरम्यान विशाखापट्टणम येथे पार पडणार आहे.

स्वरा हिने बालपणापासूनच वडील मंगेश करंडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्लब व शाळा स्तरावर नियमित, शिस्तबद्ध प्रशिक्षण घेत आपले क्रिकेट कौशल्य विकसित केले. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मार्गदर्शन सत्रे व प्रशिक्षण शिबिरांमुळे तिच्या खेळात सातत्याने प्रगती होत असून तिची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. सध्या ती लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची इयत्ता नववीची विद्यार्थिनी असून, तिच्या क्रीडा प्रवासात शाळा प्रशासनाने मोलाचे सहकार्य व प्रोत्साहन दिले आहे.

तिच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष व माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष बलदेव खुंगर, लायन्स क्लबचे अध्यक्ष तुषार नगरवाला तसेच पदाधिकारी सुधीर दामले, चंद्रकांत जोबनपुत्रा, शमिम अहमद, नरेंद्र बरडिया, किशन चौधरी, महेंद्र श्रीवास्तव, डॉ. के. आर. लाल, रमेश बोहरा, अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्य चित्रा देशपांडे, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी स्वराचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विशाखापट्टणम येथे होणाऱ्या या स्पर्धेत स्वराच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे विशेष लक्ष लागले असून, भविष्यात ती राष्ट्रीय स्तरावर विदर्भ व लायन्स स्कूलचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास सर्वत्र व्यक्त केला जात आहे.










