वणी टाईम्स न्युज: वणी पोलीस स्टेशन अंतर्गत सन २०२५ अखेर एकूण ७८५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळाले आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये खुनाचे ६, खुनाचा प्रयत्न २, दरोडा १, जबरी चोरी १, घरफोडी १९, चोरी ७१, दुखापतीचे ६३ तसेच प्राणांतिक अपघाताचे ३५ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

याशिवाय दारुबंदी अंतर्गत ६७, जुगारप्रकरणी १०८ आणि इतर स्वरूपाचे ४४९ गुन्हे दाखल झाले आहेत. भाग १ ते ५ अंतर्गत एकूण ३०० गुन्हे नोंद असून त्यापैकी २४७ गुन्हे यशस्वीरीत्या उघडकीस आले आहेत. भाग ६ अंतर्गत ४८४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
घरफोडीच्या एकूण १९ गुन्ह्यांपैकी १० गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून चोरीस गेलेल्या ४३ लाख ७३ हजार ८१७ रुपयांच्या मुद्देमालापैकी १६ लाख ३१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच चोरीच्या ७१ गुन्ह्यांपैकी ३६ गुन्हे उघडकीस आले असून १ कोटी ६ लाख ९६ हजार २०६ रुपयांच्या चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ७४ लाख ७२ हजार ३५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एकूण मालमत्तेच्या गुन्ह्यांमध्ये सुमारे ६३ टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे. वर्षअखेरीस पोलीस स्टेशनच्या प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेतला असता, भाग १ ते ५ मधील ३०० गुन्ह्यांपैकी केवळ ३१ गुन्हे तपासावर प्रलंबित असून ही टक्केवारी अवघी १०.३३ टक्के इतकी आहे.
ठाणेदार पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर यांचे नेतृत्वात वणी पोलीस स्टेशनची ही कामगिरी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दल तत्पर असल्याचे दिसून येत आहे.










