वणी टाईम्स न्युज: वणी उप विभागात मागील काही दिवसांपासून सुरु सततच्या पावसामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे वणी, मारेगाव व झरीजामणी तालुक्यातील शेतकऱ्यांचे उभे पिक गळून पडले आहे. शेतांमध्ये पाणी तुंबल्यामुळे सोयाबीन हातातून गेला आहे. बियाणे व फवारणीचा खर्च सुद्धा परत मिळणे कठिण असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

वणी तालुक्यातील मोहदा येथील प्रतीक बंडू ठावरी यांची 4 हेक्टर मधील सोयाबीन व सुवर्णा बंडू ठावरी हिची 1.21 हेक्टर वरील कपाशी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. अतिपावसामुळे सिंधी वाढोणा येथील शेतकरी राजीव आस्वले यांच्या 4 एकरामधील कपाशी झाडांची पाने लाल पडून बोंडे सडू लागली आहे. तर 2 एकर सोयाबीन पिवळे पडून दाणा भरला नाही. वणी तालुक्यातील निवली येथील शेतकरी गजानन गोवारदीपे यांचे सोयाबीन पिक अतिवृष्टीमुळे संपूर्ण नष्ट झाल्यामुळे त्यांनी उभ्या पिकात बकऱ्या व जनावर सोडले.

पंधरा दिवसापासून सलग पाऊस कोसळत असल्यामुळे सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातातून जवळपास गेला आहे. सोयाबीनच्या शेतात पाणी साचले असल्याने कोंब फुटल्याने हे पिक आता निरुपयोगी झाले आहे. निसर्गाच्या कोपामुळे शेतकरी रडकुंडीस आला असुन त्याला मोठा आर्थीक फटका बसला आहे. शासन स्तरावरून अद्याप कोणतीही हालचाल व पंचनामे होतांना दिसत नाही. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान पाहता शासनाने वणी, मारेगाव, झरीजामणी तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी. अशी शेतकऱ्याची मागणी आहे.







