वणी टाईम्स न्युज : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या आरोपीस अखेर वणी पोलिसांनी चिखलगाव येथून अटक केली. या प्रकरणात तक्रार दाखल होऊन तब्बल सात दिवस उलटून गेले असतानाही पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती. मात्र, सोमवारी पीडितेच्या नातेवाइकांसह परिसरातील सुमारे १५० नागरिकांनी वणी पोलिस ठाण्यावर धडक दिल्यानंतर केवळ काही तासांत आरोपी वेकोलि कर्मचारी मोहम्मद हकीमोद्दीन पठाण रा. मेघदूत कॉलनी चिखलगाव याला शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळाले.
या प्रकरणात विशेष म्हणजे पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतरही तब्बल एक आठवडा उलटून गेला तरी आरोपी मोकाट फिरत होता. पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याऐवजी वेळकाढूपणा केल्याची टीका नागरिकांनी केली आहे. नागरिकांचा रोष उफाळून आल्यानंतरच पोलिसांनी हलक्या हाताने घेतलेला तपास झपाट्याने वेग घेतला आणि काही तासात आरोपीचे लोकेशन मिळवून त्याला अटक करण्यात आली.
या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित झाले असून, केवळ जनक्षोभाच्या दबावामुळेच पोलिसांनी तातडीने हालचाल केली असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर करून कारागृहात पाठविण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार पो. नि. गोपाल उंबरकर यांनी दिली.











