जितेंद्र कोठारी, वणी: नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा कोलांटउड्यांचे राजकारण चर्चेत आले आहे. नुकतेच झालेल्या निवडणुकीत थेट अथवा अप्रत्यक्षपणे भाजपविरोधात काम करणारे काही स्थानिक नेते आणि कार्यकर्ते आता अचानक भाजपकडे जवळीक वाढवीत असल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य आणि संभ्रम निर्माण झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक काळात पक्षशिस्त झुगारून विरोधकांना मदत करणारे, प्रचारात दुटप्पी भूमिका घेणारे काही चेहरे सत्तेची गणिते बदलत असल्याचे पाहून आता भाजपकडे ‘पलटी’ मारत आहेत. यामुळे प्रामाणिक, निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे, नगर परिषद निवडणुकीत भाजपची भूमिका भक्कम राहावी यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी सातत्याने परिश्रम घेतले. मात्र, निवडणुकीनंतर संधीसाधू राजकारण करणाऱ्यांना जवळ केल्यास पक्षाच्या प्रतिमेला आणि संघटनात्मक शिस्तीला धक्का बसू शकतो. अशी चर्चा पक्षांतर्गत सुरू आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, निवडणूक जिंकण्यासाठी केवळ संख्या महत्त्वाची नसून निष्ठा, विश्वास आणि पक्षाशी प्रामाणिक बांधिलकी हे घटक अधिक निर्णायक ठरतात. वारंवार पक्ष बदलणाऱ्या नेत्यांमुळे अल्पकालीन फायदा होऊ शकतो, मात्र दीर्घकालीन राजकीय नुकसान संभवते.
या पार्श्वभूमीवर, भाजप पक्षश्रेष्ठींनी काटेकोर भूमिका घ्यावी, संधीसाधू राजकारण्यांपासून योग्य अंतर राखावे आणि खऱ्या अर्थाने पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे. नगर परिषदेत सत्ता स्थापन करताना भाजप नेतृत्व या ‘कोलांटउड्या’ प्रवृत्तीवर कशी भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.










