वणी टाईम्स न्युज: भारतीय जनता पक्षाच्या वणी नगर परिषदेत प्रशासन व संघटनात्मक कामकाजासाठी स्पष्ट नेतृत्व आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. भाजपचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल चव्हाण यांनी नव्याने निवडून आलेले नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांना स्पष्ट शब्दांत निर्देश देत, शहरात पक्षाचा अधिकृत चेहरा हा शहर अध्यक्ष ॲड. निलेश चौधरी असल्याचे जाहीर केले.

शहर अध्यक्ष या नात्याने प्रशासन चालविण्यासाठी ॲड. निलेश चौधरी जे निर्देश देतील, ते सर्वांनी बंधनकारकपणे पाळावेत, असा स्पष्ट आदेश यावेळी देण्यात आला. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, विविध समित्यांचे सभापती तसेच सर्व नगरसेवक हे या निर्णयास बांधील राहतील, असेही जिल्हाध्यक्षांनी ठामपणे स्पष्ट केले. वणी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचे पदभार ग्रहण सोहळ्या निमित्त येथील विश्रामगृहात भाजप पदाधिकारी व नगरसेवकांसोबत संवाद साधून त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

वणी नगर परिषदेतील कारभारात कोणताही गोंधळ, विसंवाद अथवा स्वतंत्र भूमिका सहन केली जाणार नसून, संघटनात्मक शिस्त आणि एकसूत्रता राखणे ही पक्षाची प्राथमिकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. शहर अध्यक्ष ॲड. निलेश चौधरी यांचे मत व आदेश हे सर्वांसाठी अंतिम व महत्त्वाचे राहतील, असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला.

या निर्णयामुळे वणी नगर परिषदेत भाजपचे नेतृत्व अधिक स्पष्ट झाले असून, आगामी काळात विकासकामे, प्रशासकीय निर्णय आणि राजकीय भूमिका या सर्व बाबींमध्ये एकसंध व शिस्तबद्ध कार्यपद्धती अमलात येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.











