जितेंद्र कोठारी, वणी : लोकसभा निवडणूक 2024 करिता चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून भाजप तर्फे सुधीर मुनगंटीवार तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रतिभा धानोरकर यांचे माहेर वणी तालुक्यातील परमडोह गाव आहे. त्यामुळे वणी विधानसभा क्षेत्रातील मतदार जावयानंतर आता आपल्या लेकीला लोकसभेत पाठवणार, अशी जनमानसात चर्चा आहे.
काही वर्षांपूर्वी सामान्य गृहिणी असलेल्या आमदार प्रतिभा धानोरकर आता एक कुशल राजकारणी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे पती दिवंगत खासदार बाळुभाऊ धानोरकर हे महाराष्ट्र राज्यात काँग्रेस पक्षाचे एकमेव खासदार होते. त्यांच्या असामायिक मृत्यनंतर चंद्रपूर लोकसभा सीटवर काँग्रेस पक्षाने आमदार असलेल्या प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली.
लोकसभा निवडणुकीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समोर आमदार प्रतिभा धानोरकर यांचे आव्हान आहे. मुनगंटीवार सलग सहा वेळा निवडून येणारे आमदार आहेत. यापूर्वी त्यांनी 1999 मध्ये सहा महिन्यांसाठी सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून काम केले आहे. त्यानंतर 2014 मध्ये राज्याचे अर्थमंत्री म्हणून यशस्वी काम केले. आता मुनगंटीवार वन व सांस्कृतिक खात्याचे मंत्री आहेत. धानोरकर आमदार आहेत. त्यामुळे या लढाईत मंत्री बाजी मारतो की आमदार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरळ लढत ही काँग्रेससाठी फायद्याची तर भाजपसाठी नुकसानीची आहे. मात्र, यावेळी भाजपने मुनगंटीवार यांच्या रूपाने तगडा उमेदवार दिल्याने लढत रंगतदार होणार आहे