वणी : देशात हलाल प्रमाणित उत्पादनावर बंदी घालण्याची मागणी हिंदू जनजागृती समिती वणी तर्फे करण्यात आली आहे. उप विभागीय अधिकारी वणी यांचे मार्फत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन देऊन हलाल प्रमाणपत्र देणाऱ्या खाजगी आस्थापनाची चौकशीची मागणीही समितीने केली आहे.

काही वर्षांपूर्वी ‘हलाल’ शब्द फक्त मांसाहारी पदार्थ आणि मुस्लिम देशांना निर्यात होणाऱ्या मांसाहारी उत्पादन पुरता मर्यादित होते. मात्र काही खाजगी इस्लामिक संस्थांकडून मांसाहारी वस्तुंसह धान्य, फळे, शाकाहारी खाद्य पदार्थ, सौंदर्य प्रसाधने, औषधे इत्यादी उत्पादनांना हलाल प्रमाणपत्र देण्याचे प्रकार समोर आले आहे. शिवाय रुग्णालय, मॉल, डेटिंग ॲप यांनाही हलाल सर्टीफिकेट दिले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
भारतात खाद्यपदार्थांना प्रमाणपत्र देण्यासाठी केंद्र सरकारची अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अन राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन हे विभाग असताना वेगळे हलाल प्रमाणपत्र देणे म्हणजे शासनाच्या नियमांना डावलण्याचा प्रकार आहे. हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून वेगळी अर्थव्यवस्था निर्माण करुन देशातील व्यापाऱ्यांना वेठीस धरणे हा एकप्रकारे राष्ट्रद्रोह आहे. या राष्ट्रविरोधी कार्यक्रमाविषयी राष्ट्रप्रेमी नागरिकांमध्ये असंतोषाची भावना आहे.
त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने अशा संस्थांवर बंदी घालावी आणि या संस्थांची सीबीआय चौकशी करावी. अशी मागणी हिंदू जनजागृति समितीचे लोमेश्र्वर टोंगे, अनुराग काठेड, वामन मत्ते, अरुण लाकडे, धनराज भोंगळे, बंडू निंदेकर यांनी गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन देऊन केली आहे.









