वणी टाईम्स न्युज | अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “गृहलक्ष्मी स्वाभिमान अभियान – एनजीओ मीट व प्रेरणा सन्मान” या कार्यक्रमाचे आयोजन तेरापंथ महिला मंडळ वणीच्या वतीने दि. ७ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता तेरापंथ भवन येथे उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात चंदा भंडारी यांच्या सुमधुर स्वरातील मंगलाचरणाने झाली. त्यानंतर महिला मंडळातील सर्व भगिनींनी एकत्रितपणे प्रेरणा गीत सादर करून वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून वणीच्या नगराध्यक्ष विद्या खेमराज आत्राम उपस्थित होत्या, तर विशेष अतिथी म्हणून सामाजिक व राजकीय कार्यकर्त्या किरण देरकर, वन अधिकारी संगीता कोकणे तसेच जैन महिला मंडळाच्या अध्यक्षा नंदा भंडारी यांनी उपस्थिती लावली.
या प्रसंगी विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या संस्थांमार्फत राबविल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये पूर्णिमा शिरभाते (प्रयास शिक्षण संस्था), किरण देरकर (स्त्री शक्ती फाउंडेशन), डॉ. प्रणाली दुमुरे (स्माईल फाउंडेशन), कांताबाई भंडारी (श्री रामदेव बाबा सत्संग मंडळ), स्मिता नांदेकर (बाजीराव वृद्धाश्रम), संगीता खटोड (राजस्थानी महिला मंडळ वणी), रश्मी चिंडालिया (शब्दकृती फाउंडेशन वणी), स्मिता चौधरी (रॉयल फाउंडेशन), संध्या खामनकर (निर्मला देवी ट्रस्ट) आणि श्वेता जैन (आयडिया मल्टीपरपज सोसायटी) यांनी आपापल्या कार्यांविषयी माहिती देत महिलांना विविध योजना, हक्क आणि समाजोपयोगी उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले.
तेरापंथ महिला मंडळाच्या अध्यक्षा सरोज भंडारी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करताना अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळाद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, देशभरात एकाच दिवशी आणि एकाच वेळी जवळपास ७०० ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून ही संघटनशक्ती अत्यंत प्रेरणादायी आहे. विविध एनजीओ संस्थांनी महिलांसाठी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी ‘प्रेरणा सन्मान’ पुरस्कार आर्णी क्षेत्रातील सेवाभावी माता सौ. सुनंदाबाई अशोकजी छल्लानी यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या मोठ्या मुली साध्वी शताब्दी प्रभा जी यांनी सहा वर्षांपूर्वी दीक्षा घेतली असून धाकटी मुलगी मुमुक्षु चंदनजी छल्लानी यांची दि. २३ एप्रिल २०२६ रोजी लाडनूं येथे आचार्य श्री महाश्रमण जी यांच्या हस्ते दीक्षा होणार आहे. अशा संस्कारमय व सेवाभावी मातेला सन्मानित करताना तेरापंथ महिला मंडळ वणीने गौरवाची भावना व्यक्त केली.
प्रेरणा सन्मानाचे व प्रमाणपत्राचे वाचन शीतल चिंडालिया यांनी केले. कार्यक्रमात सहभागी सर्व एनजीओ संस्थांचा सन्मान प्रमाणपत्र व धार्मिक पुस्तके देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे सुयोग्य व प्रभावी संचालन मंत्री श्वेता जैन यांनी केले, तर उपाध्यक्ष कल्पना नाहर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमानंतर सर्व महिलांसाठी सामूहिक भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या कार्यक्रमास महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली असून तेरापंथ महिला मंडळ व कार्यकारिणी सदस्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.










