वणी टाईम्स न्युज : राज्य शासनाच्या निर्णयानुसार वणी तालुक्यात “छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर अभियान – टप्पा १” राबविण्यात येत असून, मार्च ते मे २०२६ या कालावधीत मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणे, विविध प्रमाणपत्रे, 7/12 दुरुस्ती, शासकीय योजनांचा लाभ तसेच आरोग्य तपासणी आदी सेवा एकाच दिवशी, एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

सर्वसामान्य जनता व शेतकरी यांच्या दैनंदिन महसुली प्रश्नांचे त्वरित निराकरण, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील नव्या तरतुदींची जनजागृती, डिजिटल सेवांचा प्रभावी वापर आणि Single Day Service Delivery द्वारे तत्काळ सेवा पुरविणे या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
शिबिराचे वेळापत्रक
1. गणेशपूर 7 मार्च 2026
2 . राजूर 14 मार्च 2026
3. रासा 24 मार्च 2026
4. भालर 1 एप्रिल 2026
5. पुनवट 10 एप्रिल 2026
6. शिरपूर 17 एप्रिल 2026
7. शिंदोला 29 एप्रिल 2026
8. कायर 8 मे 2026
9. वणी 15 मे 2026
शिबिरांपूर्वी शासनाचे प्रतिनिधी गावनिहाय भेट देऊन आवश्यक अर्ज स्वीकारणार आहेत. पूर्वी अर्ज केलेल्या नागरिकांनी प्रलंबित अर्जाची प्रत संबंधित अधिकाऱ्याकडे सादर करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
उपलब्ध सेवा
▪️ प्रमाणपत्रे व दाखले
• प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे
• गाव नमुना 7/12 मधील चुका दुरुस्ती
• डिजिटल 7/12 व 8-अ उताऱ्यांचे वाटप
• उत्पन्न व जातीचे प्रमाणपत्र वितरण
• विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले
• ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र वितरण
▪️ जमीन अभिलेख अद्ययावतीकरण
• अकृषिक तरतुदींविषयी मार्गदर्शन
• नवीन व्यवस्थापन सनद प्रक्रियेची माहिती
• तुकडेबंदी उल्लंघन प्रकरणांचा निपटारा
• भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणांतील पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणे
▪️ सरकारी योजनांचा लाभ
• सामाजिक व आर्थिक सहाय्य योजनांची मंजुरी
• घरांसाठी पट्टे वितरण
• ई-मोजणी अर्ज स्वीकारणे
• ॲग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी
• नवीन शिधापत्रिका तयार व अद्ययावत करणे
▪️ इतर उपक्रम
• आधार अद्ययावत करणे
• आयुष्मान योजनेचे कार्ड तयार करणे
• पशुवैद्यकीय विभागामार्फत जनावरांचे लसीकरण, आरोग्य तपासणी व टॅगिंग
• तज्ञ डॉक्टरांमार्फत नेत्र, कान-नाक-घसा, अस्थिरोग तपासणी व महिलांच्या आरोग्यविषयक मार्गदर्शन
भू-अभिलेख कार्यालयाकडे प्रलंबित असलेले मोजणी अर्ज प्राधान्याने निकाली काढण्यात येणार आहेत. तरी वणी तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या मंडळाच्या नियोजित दिवशी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, तसेच इतरांनाही माहिती द्यावी, असे आवाहन तहसिलदार निखील धुळधर यांनी केले आहे.










