जितेंद्र कोठारी, वणी |

देशात पंतप्रधान होण्यासाठी दीर्घ राजकीय प्रवास, निवडणूक प्रक्रिया आणि लोकांचा कौल आवश्यक असतो. मात्र वरोरा शहरात एका व्यक्तीने थेट स्वतःलाच “स्वयंघोषित पंतप्रधान” घोषित करत पोलिसांकडे अंगरक्षक आणि पिस्तूल परवान्याची मागणी केल्याने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील अभ्यंकर वॉर्ड निवासी महादेव गुलाबराव आसेकर या व्यक्तीने थेट नागपूर पोलिस आयुक्त यांच्या नांवानें लिहिलेला पत्र सद्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रात त्यांनी ‘नुकतेच स्वयं इच्छेने माझी पंतप्रधान या पदावर नियुक्ती झाली असून मी स्वयं इच्छित भारताचा पंतप्रधान आहोत’. त्यामुळे पंतप्रधान यांना मिळणारे प्रमाणपत्र, सुविधा तसेच अंगरक्षक व पिस्तुल घरपोच मिळण्यात यावे. अशी मागणी स्वतःच्या लेटरहेड वर लिहिलेल्या पत्रात केली आहे.

विशेष म्हणजे अर्जदार यांच्या खाजगी कारच्या मागील काचावर “पंतप्रधान (PM) भारत सरकार” असा स्टिकर चिटकवून आढळल्याने काही नागरिक क्षणभर चक्रावले, तर काहींनी या प्रसंगाचे छायाचित्र टिपून सोशल मीडियावर शेअर केले. या घटनेनंतर शहरात विनोदी चर्चांना उधाण आले आहे. “दिल्लीची गरज काय, पंतप्रधान तर आपल्या वरोऱ्यातच आहेत!” अशा मिश्कील प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी तर “मंत्रिमंडळाची पुढील बैठक कुठे होणार?” असा हसत-खेळत सवालही उपस्थित केला.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने प्रकरणाची नोंद घेत चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. संबंधित व्यक्तीची समजूत काढण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचे सांगितले जाते. घटनेमुळे काही काळासाठी शहरात हलकाफुलका चर्चेचा आणि हास्याचा माहोल निर्माण झाला असून, वरोऱ्यातील हे ‘पंतप्रधान’ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत.










