वणी टाईम्स न्युज : 15 ऑगस्टपूर्वी भारत सरकारने “हर घर तिरंगा मोहीम” सुरू केली आहे. गेल्या ‘मन की बात’कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी harghartiranga.com या संकेत स्थळावर तिरंग्यासोबतचा सेल्फी अपलोड करण्याचे आवाहन केले होते. परंतु भारतात राष्ट्रध्वजाचा वापर आणि प्रदर्शनाबाबत काही नियम व कायदे आहेत. तसेच त्यांच्या उल्लंघनासाठी शिक्षेची तरतूद सुद्धा आहे. स्वातंत्र्यदिनी लोक अनेकदा त्यांच्या दुचाकी किंवा कारवर तिरंगा लावून फिरतात. परंतु प्रत्येकाला वाहनांवर राष्ट्रध्वज लावण्याची परवानगी नाही. भारतीय ध्वज संहिता 2002 नुसार, काही विशिष्ट लोकांना त्यांच्या वाहनांवर तिरंगा फडकवण्याचा कायदेशीर अधिकार आहे.
वाहनावर तिरंगा लावण्याची कोणाला आहे परवानगी ?
भारतीय ध्वज संहिता 2002 च्या परिच्छेद 3.44 नुसार, मोटार गाड्यांवर राष्ट्रीय ध्वज लावण्याचा विशेषाधिकार फक्त खालील व्यक्तींसाठी मर्यादित आहे-
1. राष्ट्रपती
2. उपराष्ट्रपती
3. राज्यपाल आणि लेफ्टनंट गव्हर्नर
4. भारतीय मिशन पोस्टचे प्रमुख
5. पंतप्रधान
6. कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि केंद्राचे उपमंत्री
7. लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष
8. राज्यसभा उप सभापती
9. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री
10. विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष
11. विधान परिषद उपाध्यक्ष
12. भारताचे सरन्यायाधीश
13. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
14. उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश
15. उच्च न्यायालयांचे न्यायाधीश
ध्वज फडकवताना या गोष्टी ठेवा लक्षात –
नियमांनुसार, कोणत्याही सार्वजनिक,खाजगी संस्था किंवा शैक्षणिक संस्थेचा कोणताही सदस्य कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही प्रसंगी राष्ट्रध्वज फडकावू शकतो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हाही राष्ट्रध्वज फडकवला जातो, तेव्हा त्याचा पूर्ण सन्मान केला गेला पाहिजे. राष्ट्रध्वज फडकवताना त्याची केसरीपट्टी नेहमी वरच्या बाजूला असायला पाहिजे. ध्वज योग्य ठिकाणी ठेवला पाहिजे. म्हणजे जमिनीवर किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवला जाणार नाही. याशिवाय फाटलेला किंवा घाणेरडा ध्वज फडकवू नये. याची काळजी घेतली पाहिजे.
नियम मोडल्यास काय आहे शिक्षा ?
नागरिकांना घरात तिरंगा फडकविण्याचे किंवा हातात झेंडा घेऊन चालण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु खाजगी वाहनांवर झेंडे लावणे हा कायद्याने गुन्हा आहे. यामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा 1971 अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. यानुसार, राष्ट्रध्वज, राज्यघटना आणि राष्ट्रगीत यांसारख्या भारताच्या राष्ट्रीय चिन्हांचा अपमान केल्यास, एखाद्या व्यक्तीला 3 वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
टिप : स्वातंत्र्य दिनानिमित्त जनहितार्थ बातमी प्रकाशित