वणी टाईम्स न्युज : शहरातील गुरुनगर परिसरात एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल 3 लाख 1 हजार 500 रुपयांचा माल लंपास केला आहे. सदर घटना 2 मे 2025 रोजी दिवसा घडली असून फिर्यादी यांनी रात्री उशिरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.
फिर्यादी हरिभाऊ झमाजी विखले (82), रा. गुरुनगर, वणी हे कुटुंबासह नागपूर येथे गेले होते. रात्री नागपूरहून परतल्यानंतर त्यांना त्यांच्या घराचे कुलूप तोडलेले आढळले. घरात तपासणी केल्यानंतर सोन्याचे दागिने, काश्याचे व पितळेचे भांडी, पंखे, पाण्याची मोटर इत्यादी साहित्य चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. चोरी गेलेल्या मालामध्ये सोन्याची पोत 1 किंमत 2 लाख रु., सोन्याचा गोफ 1, किंमत 45 हजार रु., सोन्याचा गोफ व लॉकेट 1 नग, किंमत 30 हजार रु., सोन्याची अंगठी 1 किंमत 10 हजार रु. घरगुती साहित्य (पंखे, मोटर, भांडी) 16 हजार 500 रु., अशा प्रकारे एकूण अंदाजे 3 लाख 1 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेला आहे.
याबाबत वणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम 331(3), 331(4), 305(A) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय अश्विनी रायबोले करीत आहेत. चोरीची घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस प्रशासनाने त्वरीत तपास करून चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी होत आहे.










