वणी टाईम्स न्युज: – गोपनीय माहितीवरून मारेगाव पंचायत समिती कृषी विभागाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने तालुक्यातील पाथरी येथे एका शेतात साठवून ठेवलेला प्रतिबंधित व बोगस कापूस बियाणांचा साठा जप्त केला. सदर कारवाईत पथकाने 13 हजार 550 रुपयांचे बोगस बियाणेचे पाकीट व दोन मोटरसायकल जप्त केली. विक्रीच्या उद्देशाने प्रतिबंधित बियाणे साठवणूक करणारं शेतमालक सम्राट पेचे (37) रा. पाथरी व दोन अनोळखी आरोपी विरुद्ध मारेगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. धाड पडताच शेतमालक सम्राट पेचे व दोन मोटरसायकल चालक घटनास्थावरून फरार झाले.
सदर ठिकाणी सम्राट पैचे (वय 37, रा. पाथरी) यांच्या ताब्यातून Galaxy HYPER COTTON HYBRID SEED Pink guard 4G+5G MORE POWER FULL Geot 5G नावाच्या कापूस बियाण्याची 15 पाकिटे किंमत 13,515 रुपये जप्त करण्यात आली. तसेच घटनास्थळी आढळलेल्या दोन दुचाकी MH29 VR 8002 आणि MH29 N 8209 असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्तीतील बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तर उर्वरित बियाणे पोलीस स्टेशन मारेगाव येथे जमा करण्यात आले. फिर्यादी प्रभारी कृषी अधिकारी पं. स. मारेगाव संदीप केरबा वाघमारे यांच्या तक्रारीवरून आरोपींवर बियाणे अधीनियम 1968 चे कलम 7,8,9, 10, 11, 12, 13, 14, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 नुसार कलम 7,8,15(1), 15 (2),16(1) तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3,7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही मारेगाव पं. स चे .प्र. कृषी अधिकारी संदीप केरबा वाघमारे, प्रविण आबासो जाधव,मोहिम अधिकारी, जि.प. यवतमाळ, तालुका कृषी अधिकारी, मारेगाव दिपाली खवले तसेच एलसीबी यवतमाळ येथील सपोनि अजय कुमार वाढवे, हेड कॉन्स्टेबल सुधीर पांडे, पोलीस कॉन्स्टेबल सलमान शेख, रंजनिकांत मडावी, चालक नरेश राऊत यांनी पार पाडली. कृषी विभाग व पोलिसांनी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, अनधिकृत बियाण्याची खरेदी टाळावी असे आवाहन करण्यात आले आहे.










