वणी टाईम्स न्युज: शहरालगत चिखलगाव येथे एका युवकाला गावातील गुंड प्रवृत्तीच्या इसमाने धमकावत त्याच्या खिशातून बळजबरीने तीन हजार रुपये हिसकावल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून आरोपी अमोल भुऱ्या ठाकरे विरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार दौलत काशीनाथ चौधरी (34) रा. चिखलगाव, ता. वणी याने दिलेल्या जबानीत म्हटले आहे की, तो चिखलगाव येथे कुटुंबासह वास्तव्यास असून सलून व्यवसाय करतो. दि. 21 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता तो आपल्या मावशीच्या घरी जात असताना, गावातील अमोल उर्फ भूर्या ठाकरे, रा. रामनगर, चिखलगाव याने त्याला अडवले.
यावेळी आरोपी ठाकरे याने तक्रारदाराकडे 500 रुपये मागितले. पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याने चौधरी याला धमकावून त्याच्या शर्टच्या वरच्या खिशातून जबरदस्तीने तीन हजार रुपये हिसकावून घेतले. आरोपीचा स्वभाव गुंडगिरीचा असून गावात दादागिरी करून नागरिकांमध्ये भीती निर्माण केली असल्याचेही तक्रारदाराने नमूद केले आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून आरोपीविरुद्ध पुढील कार्यवाही सुरू आहे.










