वणी टाईम्स न्युज: वणी पोलीस स्टेशन हद्दीतील कुंभारखणी वसाहतीत चोरट्यांनी एकाच रात्री तीन घर फोडले. दि. 10 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान घडलेल्या चोरीच्या या घटनेत चोरट्यांनी सुमारे 1 लाख 45 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
फिर्यादी हिंम्मत रामा सहारे (41), रा. MQ-180, कुंभारखणी कॉलनी यांनी वणी पोलीस स्टेशनला दिलेल्या जबानीत म्हटले आहे की, ते WCL घोन्सा OC येथे नोकरीस असून, रक्षाबंधन निमित्ताने 10 ऑगस्ट रोजी पत्नी व दोन मुलांसह नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील घरी गेले होते. दरम्यान 13 ऑगस्ट रोजी सकाळी शेजारी सतीश बेलवंशी यांनी फोनवर माहिती दिली की, त्यांच्या क्वॉर्टरचा दरवाजा तुटलेला आहे.
व्हिडिओ कॉलवरून घरातील स्थिती पाहिल्यावर सहारे यांनी तातडीने घरी परत येत चौकशी केली असता चोरट्यांनी घरातील कपाट फोडून 8 ग्रॅमची सोन्याची पोत (किंमत ₹48,000), 4.5 ग्रॅमचे सोन्याचे कानातले (₹27,000), 3 ग्रॅमची सोन्याची अंगठी (₹18,000), 4 ग्रॅमची सोन्याची मणी (₹24,000) व 1 ग्रॅमची सोन्याची नथ (₹6,000) असा एकूण ₹1,23,000 किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे उघड झाले.
याच कालावधीत कॉलनीतील इतर दोन रहिवाशांचे घर देखील चोरट्यांनी टार्गेट केले. कॉलनीतील MQ-81 क्वार्टर मधील रहिवासी दिलीप गंगाधर वांढरे यांच्या क्वॉर्टरमधून ₹10,000 रोख रक्कम तर सुभाष हुड यांच्या MQ-204 क्वॉर्टरमधून ₹12,000 रोख रक्कम चोरीस गेल्याची माहिती समोर आली आहे. असा एकूण ₹1 लाख 45 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची नोंद वणी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 305(अ), 331(4) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.










