वणी टाईम्स न्युज | जिल्ह्यात रेती तस्करीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, मध्यरात्रीनंतर वरोरा ते यवतमाळ व्हाया वणी या मार्गावर पल्ला गाड्यांद्वारे मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक सुरू असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पोलिस, वाहतूक पोलिस, एलसीबी तसेच महामार्ग पोलिसांच्या नजरेखालून ही वाहतूक होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत वर्धा नदीच्या घाटातून रेती भरुन लांब व उंच पल्ल्याचे ट्रक वरोरा ते वणी व यापुढे धावताना दिसतात. या वाहनांवर तिरपाल टाकून रेती लपविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र थेट नदी पात्रातून भरलेल्या ओल्या रेतीचा पाणी ट्रकच्या मागील बाजूस रस्त्यावर गळत असल्याने क्षणात लक्षात येते की या वाहनात रेती आहे. रेतीच्या वाहनातून रस्त्यावर सांडणाऱ्या पाण्यामुळे अपघाताचा धोका वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत अधिक धक्कादायक बाब म्हणजे, या मार्गावर अनेक तपासणी नाके असतानाही ही अवैध रेती वाहतूक विनाअडथळा सुरू असल्याचे दिसते. वरोरा ते यवतमाळ पर्यंत पोलिसांची नाईट पेट्रोलिंग वाहने रात्रभर गस्त घालतात. शिवाय वाहतूक पोलिस, LCB पथक, महामार्ग पोलिस व महसूल विभागाचे पथकसुद्धा महामार्गावर फिरतात. अशातच रेती भरलेले वाहने त्यांच्या नजरेखालून धावत असल्याने ही अवैध वाहतूक कोणाच्या छत्रछायेत सुरु आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अवैध व्यवसाय विरुद्ध जिल्हाभर कार्यवाही करणाऱ्या स्थानिक गुन्हा विभाग (LCB) पथकाला वरोरा ते वणी ते यवतमाळ अवैध रेती तस्करीबाबत माहिती आहे. मात्र रेतीच्या ट्रक मधून गळणारा पाणी कुठं पर्यंत मुरत आहे ? याबाबत साधारणपणे अंदाज लावता येते ! रेती तस्करीच्या मोठ्या व्यावसायिकाच्या या रॅकेटमध्ये संबंधित सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी वाटेकरी असल्याचेही बोलले जाते.










