वणी टाईम्स न्युज | शहरात अपघात व चोरीच्या तीन वेगवेगळ्या घटना समोर आल्या असून, यामध्ये एका दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे, तर दोन ठिकाणी चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये चिंता वाढवली आहे.
कार-दुचाकी अपघातात एक जखमी
वणी येथे भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने प्रशांत श्यामराव नक्षिणे (42) हे गंभीर जखमी झाले. फिर्यादी बंडूजी हरिभाऊ आसेकर (62) हे आपल्या दुचाकी क्रमांक एमएच 29-एएस-7461 ने महावितरण कार्यालय मार्गाने जात असताना, कार क्रमांक एमएच-29-बीव्ही-1317 चालकाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या नक्षिणे यांचा उजवा हात व पाय फ्रॅक्चर झाला आहे. या प्रकरणी आसेकर यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपी कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
बसस्थानकात महिलेचे दागिने चोरी
वणी बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने लंपास केले. अर्चना रमेश कोल्हे (46) या बसमध्ये चढत असताना त्यांच्या पर्समधून सुमारे 48 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीस गेले. या दागिन्यांची किंमत सुमारे 87 हजार 813 रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी कोल्हे यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गणेशपूरमध्ये फ्लॅट फोडून चोरी
शहरालगतच्या गणेशपूर परिसरात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून सुमारे 31 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. संदीप विजय पामपट्टीवार (57) हे कुटुंबासह 18 मार्च रोजी बाहेरगावी गेले होते. 23 मार्च रोजी परत आल्यानंतर त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा तुटलेला आढळला. घरातील कपाटातून सोन्याचे दागिने व 10 हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे उघड झाले. पामपट्टीवार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
तिन्ही घटनांमध्ये वणी पोलिसांनी गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू केला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










