वणी टाईम्स न्युज | राज्यात प्रतिबंधित असलेल्या कीटकनाशक औषधांची अनधिकृतरीत्या विक्री करताना आदिलाबाद (तेलंगणा) येथील दोन व्यक्तींना रंगेहाथ पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा (एल.सी.बी.) व कृषी विभागाला यश आले आहे. वणी घुग्गुस मार्गावर वाघदरा फाटा येथे बुधवार 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता ही कारवाई करण्यात आली.
कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) श्री. दीपक चंद्रप्रकाश वानखेडे यांना 13 ऑगस्ट रोजी गुप्त माहिती मिळाली की, दोन इसम महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेले फवारणीचे औषध विक्रीसाठी आणले आहेत. त्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून एल.सी.बी.चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले. कृषी विभागाचे अधिकारी रविंद्र भोजने, देवेंद्र पाचभाई, विश्वास फुलमाळी यांच्या उपस्थितीत वाघदरा फाटा येथे सापळा रचण्यात आला.
पथकाने सायंकाळी सुमारे 7 वाजता संशयास्पद स्थितीत असलेली MH-29 R-3029 क्रमांकाची मारुती सुझुकी कार अडवून तपासणी केली असता, कारमध्ये 80 बॉक्स व 10 बॉटल प्रतिबंधित फवारणी औषध आढळले. पोलिसांनी कारमधील दोन इसमांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर औषध आदिलाबाद येथून आणून शेतकऱ्यांना विक्री करीत असल्याचे सांगितले.
अवैधरीत्या कृषी औषध विक्री करताना आढळल्यामुळे पोलिसांनी आरोपी योगेश गुणवंतराव देशमुख (44), रा. बेला, जि. आदिलाबाद (तेलंगणा) व सचिन शंकर उरकुडे (40), रा. बेला, जि. आदिलाबाद (तेलंगणा) यास अटक केली. पथकाने आरोपीकडून फवारणीची औषध : किंमत ₹ 2,14,190 व मारुती सुझुकी कार : किंमत ₹ 3,00,000 असे एकूण मुद्देमाल : ₹ 5,14,190 चा मुद्देमाल जप्त केला.
आरोपींवर महाराष्ट्र शासन, कृषी विभाग तसेच शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी वणी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 318(4) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर करीत आहेत.










