वणी: गाडी घेण्याकरिता माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या चौघांवर वणी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पिडीत महिलेनी 6 एप्रिल रोजी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.
पिडीत महिलेनी दिलेल्या तक्रारीनुसार तिचे लग्न मे 2023 मध्ये सामाजिक रीतीरिवाजा प्रमाणे मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथील खिमेश्वर मधुकर बांदुरकर सोबत झाले होते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीपासून गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आण या कारणावरून तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरु झाला. मात्र तिनं पैसे आणण्यासाठी नकार दिला. दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी पती खिमेश्वर हा दारू पिऊन आला व काही कारण नसताना तिला बेदम मारहाण करून घराबाहेर काढले. त्यावेळी सासरा, सासू व भासरा तिच्याविरुद्द पतीला भडकावून चिथावणी देत होते. तसेच परत घरी आली तर जीवानिशी ठार मारू अशी धमकी त्यांनी दिली.
घरातून काढल्यानंतर पिडीतेनी भावाला फोन करून बोलाविले व त्याच्या सोबत माहेरी आली. गैरअर्जदार सासरच्या लोकांकडून तिच्या जीवाला धोका असल्याने पिडीत युवतीने वणी पोलीस स्टेशनला तक्रार देऊन योग्य कार्यवाहीची मागणी केली आहे. पिडीतेच्या फिर्यादवरून वणी पोलीस ठाण्यात आरोपी पती खिमेश्वर मधुकर बांदुरकर (32), तसेच सासू, सासरा व भासरा सर्व रा. चिंचमंडळ ता. मारेगाव विरुद्द 34 , 498 (अ), 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.










