वणी टाईम्स न्युज : शहरातील लालगुडा परिसरात विद्युत दुरुस्तीच्या कामादरम्यान इलेक्ट्रीक शॉक लागून कंत्राटी कामगार अतुल भाऊराव कोसारकर (34) यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी एमएसईबीचे कर्मचारी विनोद मडावी, सुपरवायझर पंकज क्षीरसागर व इलेक्ट्रिकल ठेकेदार सचिन बिलोरीया यांच्याविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार पीएसआय सुयोग महापुरे यांच्या फिर्यादवरुन ही कारवाई करण्यात आली आहे.

मर्ग चौकशीदरम्यान उघडकीस आले की, 20 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी MSEB लालगुडा येथे विद्युत दुरुस्तीचे काम करताना मृत्यूमुखी पडलेल्या कामगार अतुल कोसारकर याचा मृत्यू .एमएसईबी व विद्यूत कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे झाला होतं. संबंधित लाइनचा विद्युत पुरवठा बंद न करता अकुशल कामगार अतुल कोसारकर यांना पोलवर कामासाठी चढविण्यात आले. परिणामी त्यांना शॉक लागून जागीच मृत्यू झाला. वैद्यकीय पोस्टमार्टेम अहवालात मृत्यूचे कारण ‘इलेक्ट्रोक्यूशनमुळे झालेला कार्डियाक अरेस्ट’ असे नमूद आहे.

तसेच घटनेनंतर मृतकाच्या पत्नीला गुन्हा नोंदवू नये म्हणून दहा लाख रुपये आर्थिक व्यवहार करण्यात आल्याची बाबही चौकशीत स्पष्ट झाली आहे. इलेक्ट्रिक सेफ्टी ऑफिसर व वीज वितरण केंद्राकडून आवश्यक माहिती न मिळूनही उपलब्ध पुरावे, साक्षी व मर्ग अहवालांच्या आधारे आरोपी एमएसईबीचे कर्मचारी विनोद मडावी, सुपरवायझर पंकज क्षीरसागर व ठेकेदार सचिन बिलोरीया या तिघांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 105, 251 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.







