वणी टाईम्स न्युज : सोमवारचा दिवस हा वणीच्या राजकारणाला कलाटणी देणारा उजळला. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले विजय चोरडिया यांनी पक्षाला रामराम करीत शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतला. मुंबई येथे शिवसेना (शिंदे) चे पक्ष प्रमुख व राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड तसेच माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या उपस्थितीत विजय चोरडिया यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना (शिंदे) गटात अधिकृत प्रवेश घेतला.
सुप्रसिद्ध सराफा व्यावसायिक व समाज सेवक विजय चोरडिया हे भाजप राज्य कार्यकारिणीचे माजी सदस्य तसेच यवतमाळ जिल्हा भाजप कमिटीचे निमंत्रित सदस्य होते. मागील विधानसभा निवडणुकांपासून माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व विजय चोरडिया यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. मध्यंतरी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांना काजूकतलीचे घास भरवून दोघांमध्ये सामंजस्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांच्या मनातल्या गाठी काही खुलल्या नाहीत.

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीने विजय चोरडिया यांनी घेतलेल्या या निर्णयाची शहरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेस सोडून भाजपाई आणि आता शिवसैनिक झालेले विजय चोरडिया हे शिवसेना (शिंदे) गटाला वणी विधानसभा मतदारसंघात कितपत उभारी देतात ? हे येणाऱ्या निवडणुकांत समोर येईल. विशेष म्हणजे विजय चोरडिया यांचे सुपुत्र एड. कुणाल चोरडिया हे भारतीय जनता पक्षाचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदावर कायम आहेत. या प्रसंगाने एकाच कुटुंबातील भाजपची वरिष्ठ नेता स्व. विजयराजे सिंधिया आणि काँग्रेसचे नेता त्यांचे पुत्र स्व. माधवराव सिंधिया यांच्या आठवणीला उजाळा मिळाला.










