वणी टाईम्स न्युज : नगर परिषद निवडणुकीत पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयातीत उमेदवाराना तिकीट देण्यावरून काँग्रेस पक्षामध्ये घमासान सुरु आहे. पक्षाची वरिष्ठ नेत्री व वणी शहर महिला काँग्रेस अध्यक्षा शामाताई तोटावार यांनी बुधवार 19 नोव्हेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर शामाताई तोटावार यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसचे देऊळ पाण्यात असल्याची खमंग चर्चा सुरु झाली आहे.
यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस कमिटी अध्यक्षा वंदना पुरुषोत्तम आवारी यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी आरोग्य व कौटुंबिक कारणामुळे जबाबदारी सांभाळण्यात असमर्थ असल्याचे नमूद केले आहे. मात्र त्यांचे जवळचे एका कार्यकर्त्याला नगर परिषद निवडणूकित उमेदवारी न मिळाल्याने नाराज शामाताई यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
उल्लेखनीय आहे की महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना (उबाठा) व काँग्रेसने नगर परिषद निवडणुकीत आघाडी कायम ठेवत उमेदवार उभे केले आहे. मात्र आघाडीमुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला. अखेरपर्यंत प्रयत्न करूनही हातात एबी फार्म न मिळाल्याने नाराज काही कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश घेऊन उमेदवारीही मिळविली. तर आपल्या खंदे कार्यकर्त्याला डावलल्यामुळे पक्षातील काही वरिष्ठ नेते व कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरल्याचे सूत्रांनी सांगितले.










