वणी टाईम्स न्युज : येथील जैन लेआऊट मधील तरुणाने बुधवार 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजून 1 मिनिटांनी वर्धा नदीच्या पाटाळा येथील पुलावरुन नदीत उडी घेतली होती. स्थानिक पोलीस व महसूल पथकाने बुधवारी सायंकाळी पर्यंत नदी काठावर शोध मोहीम राबविली होती. मात्र त्याचा काही शोध लागला नव्हता. अखेर आज गुरुवारी जिल्हा पोलीस बचाव पथकाचे जवान बोटीच्या सहाय्याने शोध घेण्यासाठी नदीत उतरले आहे.
सविस्तर वृत्त असे की, वणी येथील जैन ले आऊट मधील प्रणय संजय गोखरे (22) हा तरुण बुधवारी सकाळी रागाच्या भरात दुचाकी घेऊन घरुन निघून गेला होता. प्रणयचे मित्र त्याच्या शोधात निघाले असता पाटाळा पुलावर त्याची दुचाकी उभी दिसली. मात्र प्रणय कुठेच दिसून पडला नाही. शेवटी त्यांनी पुलावरील सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे फुटेजची तपासणी केली असता सकाळी 10 वाजून 1 मिनिटांनी प्रणय हा नदीत उडी घेताना दिसून पडला.
सदर घटनेबाबत तात्काळ वणी पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर पोलीस स्टाफसह वर्धा नदी पुलावर पोहचले. तसेच महसूल विभागाचे कर्मचारी सुद्धा प्रणयच्या शोधकामी लागले होते. मात्र सायंकाळ पर्यंत त्याचा पत्ता लागला नाही. शेवटी यवतमाळ येथून जिल्हा पोलीस दल आपत्कालीन बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. बातमी लिहेपर्यंत बचाव पथक नदी पात्रात शोध घेत आहे. मात्र अद्याप प्रणय गोखरे याचा काही शोध लागला नसल्याची माहिती आहे.










