वणी टाईम्स न्युज : वणी शहरातील एमआयडीसी परिसरात रविवारी सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. वीज खांबावर चढून तारा जोडणीचे काम करत असताना एका कंत्राटी वीज कामगाराचा करंट लागून दुर्देवी मृत्यू झाला. अतुल भाऊराव कोसारकर (30) रा. मोहुर्ली, ता. वणी असे मृत मजुराचे नाव असून, तो एका खासगी कंत्राटदारामार्फत महावितरणसाठी काम करत होता.
प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे एमआयडीसी परिसरात अनेक ठिकाणी विजेचे खांब जमीदोस्त झाले होते. तसेच वीज तारांवर झाडे पडल्यामुळे ठिकठिकाणी तारा तुटले होते. वीज खांब उभारणी व तारा जोडण्यासाठी महावितरण कंपनीने एका खाजगी विद्युत कंत्राटदारा मार्फत दुरुस्तीचे काम सुरू केले होते.
एमआयडीसी येथे पोतदार लाईम स्टोन फॅक्टरी जवळ तुटलेल्या तारा जोडण्यासाठी अतुल विजेच्या खांबावर चढला होता. त्यावेळी महावितरण कंपनीचे दोन लाईनमेनसुद्धा तिथे हजर होते. ट्रान्सफॉर्मर वरून विद्युत पुरवठा बंद केल्यानंतर त्यांनी मजूर अतुल या वीज खांबावर चढण्यास सांगितले. खांबावर झुला टाकून तारा जोडणी करीत असताना अचानक वीज पुरवठा सुरू झाल्याने त्याला तीव्र करंट लागला आणि तो मृत्यूमुखी पडून खांब्यावरच लटकला.
घटनास्थळी उपस्थित इतर कामगार व लाईनमन यांनी क्रेनच्या मदतीने अतुलला खाली उतरवून वणी ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतक अतुल कोसारकर यांच्यामागे पत्नी व दोन लहान मुले असून घरचा कर्ता गेल्याने कोसारकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विशेष म्हणजे, कामाच्या वेळी मजुराकडे पूर्ण सुरक्षा साधने उपलब्ध नव्हती, ज्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी वीज वितरण कंपनी व संबंधित कंत्राटदाराच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.










