सुशील ओझा झरी : तालुक्यातील मार्की (बु.) येथे धाबा चालक युवकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत दोन आरोपींना अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मृतक गजानन उर्फ आझाद मोरेश्वर उदकवार (वय 32, रा. मार्की बु.) यांनी महिनाभरापूर्वी मार्की-मुकूटबन मार्गावर टिनशेडचा धाबा सुरू केला होता. धाबा सुरू झाल्यापासून गावातील सचिन सुधाकर टोंगे आणि साहील राजेश काकडे यांच्याशी त्याचे वाद सुरू होते. धाबा सुरू करू देणार नाही, अशी धमकीदेखील आरोपींनी दिल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 9 जून रोजी धाब्यावरील आचारी सुट्टीवर असल्याने गजानन एकटाच धाब्यावर होता. रात्री सुमारे 10 वाजताच्या सुमारास आरोपी सचिन टोंगे व साहील काकडे यांनी धाब्यावर येऊन जेवण बनवून देण्याच्या कारणावरून गजाननशी वाद घालत मारहाण केली. याबाबत गजाननने वडील मोरेश्वर उदकवार यांना फोन करून माहिती दिली होती.
वडील मोरेश्वर उदकवार व धाकटा भाऊ गणेश हे तातडीने धाब्यावर पोहोचले. त्यांनी दोन्ही आरोपींना समज देऊन वाद मिटवला. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेले. मात्र, याच रागातून आरोपींनी मध्यरात्रीनंतर पुन्हा धाब्यावर येत झोपेत असलेल्या गजाननवर लाकडी दांडक्याने डोके, कपाळ व तोंडावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या गजाननचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
बुधवारी सकाळी गजाननची आई मायाबाई उदकवार चहा घेऊन धाब्यावर गेली असता मुलगा रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेला दिसला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी धाव घेतली. घटनास्थळी बाजेखाली मोठ्या प्रमाणात रक्त साचलेले असून रक्ताने माखलेला लाकडी दांडकाही आढळून आला.
या प्रकरणी मृतकाचे वडील मोरेश्वर उदकवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुकुटबन पोलिस ठाण्यात तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान आरोपी सचिन टोंगे व साहील काकडे दोघ राहणार मार्की यांना अटक करण्यात आली.
या गुन्ह्याचा वेगाने छडा लावण्यात शिरपूरचे ठाणेदार तथा सहायक पोलीस निरीक्षक संतोष मनवर व कॉन्स्टेबल प्रशांत झोड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत आरोपींना जेरबंद केले.
या घटनेमुळे मार्की परिसरात मोठी खळबळ उडाली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून पुढील तपास मुकुटबनचे ठाणेदार सतीश जाधव यांचे मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.










